नोकरी गमावलेल्या शिक्षकांचे आंदोलन तीव्र   

पश्चिम बंगालच्या शिक्षण सेवा विभागाच्या मुख्यालयाला वेढा

कोलकाता : पश्चिम बंगालमधील नोकरी गमावलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यानी मंगळवारी आंदोलन तीव्र केले. त्या अंतर्गत त्यांनी सॉल्ट लेक येथील शालेय शिक्षण सेवा आयोगाच्या मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. दरम्यान, सोमवारपासून मुख्यालयाला आंदोलकांनी वेढा घातला आहे.त
 
राज्यातील शैक्षणिक भरती गैरव्यवहार चव्हाट्यावर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुमारे २६ हजार शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश नुकतेच दिले होते. या संदर्भातील निकाल ३ एप्रिल रोजी जाहीर केला होता. त्यामुळे त्यांनी आंदोलनास सुरूवात झाली. काल आंदोलनाला पुन्हा धार आली आहे. राज्य शालेय सेवा विभागासमोर आंदोलन करण्यात आले. कडक उन्हात विभागाच्या मुख्यालयाला सुमारे दोन हजार आंदोलकांनी घेराव घातला होता. त्यामुळे मुख्यालयातील कर्मचार्‍यांची गैरसोय झाली. आंदोलकांनी मार्ग रोखले. त्यामुळे त्यांना आत बाहेर करणे अवघड झाले. त्यामध्ये आयोगाच्या अध्यक्ष सिद्धार्थ मुजूमदार यांना देखील आंदोलनाचा फटका बसला आहे. त्या सोमवारी सायंकाळपासून इमारतीत अडकून पडल्या आहेत.
 
गुणवत्तेवर नियुक्त आणि लाच देऊन नोकरी मिळविलेल्या उमेदवारांची  यादी आयोगाने जाहीर करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांची आहे. आमचे आणखी नुकसान होणार नाही, आम्हाला केवळ न्याय हवा आहे.केवळ पोकळ आश्वासने नकोत. आणखी खोटे ऐकणार नाही, असे एका आंदोलकाने सांगितले. मुख्यालयात कोणताही खाद्यपदार्थ यापुढे जाणार नाही. आमच्या विरोधात बळाचा वापर कराल तर याद राखा, आम्ही उन्हात आंदोलन करत असून मुख्यालयात गारव्यात बसलेल्यांना देखींल झळ लागली पाहिजे. 
 
बॅरिकेड्स घालून सुरक्षा वाढवली आहे. पण, कोणताही खाद्यपदार्थ आत जाणार नाही, उपासमारीची झळ संबंधितांना बसल्यानंतर आमच्या व्यथा त्यांना समजतील, असे एका आंदोलकाने सांगितले.
 

Related Articles